मुंबई - ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत येत्या सोमवारपासून (8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा असणार आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईकरांना दिलासा.. सोमवारपासून बेस्टच्या बसमधून सामान्य लोकांना करता येणार प्रवास
बेस्ट बस सेवा सुरू होत आहे. बसमधील डावीकडे-उजवीकडे दोन जणांसाठी असलेल्या प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसून प्रवास करू शकेल. तसेच फक्त 5 प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार आहे. नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात बस धावणार नसल्याचे बेस्टच्या जनसंपर्क विभागाने कळवले आहे.
राज्याने 31 मे, 4 जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार आणि 2 रोजी मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार बेस्ट प्रशासनाने बेस्ट बसमधून सामान्य प्रवाशांना सामाजिक अंतर राखून प्रवास करू देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बसमधील डावीकडे आणि उजवीकडे दोन जणांसाठी असलेल्या प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसून प्रवास करू शकतो. तसेच फक्त 5 प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार आहे.
नागरिकांनी नियम पाळून बेस्टला सहकार्य करण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. मात्र पालिकेने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात बस धावणार नसल्याचे बेस्टच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.