अहमदनगर- भाजपशी बंडखोरी करणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही कारवाई केली आहे. पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून अपक्ष उमेदवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे करत असल्याने पक्षाकडून कारवाई करत शिस्तभंग केल्याचे कारण देत हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपशी बंडखोरी करणाऱया भाऊसाहेब वाकचौरेंची पक्षातून हकालपट्टी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात वाकचौरे हे बंडखोरी करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढत आहेत. भाऊसाहेब वाकचौरे हे भाजप कोठ्यातून साईबाबा संस्थानचे विश्वस्त आहेत. त्यामुळे आता त्यांना विश्वस्तपदालाही मुकावे लागणार आहे.
कोण आहेत भाऊसाहेब राजाराम वाकचौरे -
साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी म्हणून भाऊसाहेब वाकचौरे यांनी काहीकाळ काम पाहिले. त्यानंतर 2009 ला रामदास आठवले यांचा पराभव करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या जोरावर खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 ला मोदी लाट असतानाही वाकचौरे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे निवडून आले.
त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली मात्र तिथेही वाकचौरे यांचा काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी पराभव केला होता. भाजपच्या कोठ्यातून साई संस्थानचे विश्वस्त पद भाऊसाहेब वाकचौरे यांना देण्यात आले मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात वाकचौरे अपक्ष निवडणूक लढत असल्याने भाजप प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी केली असून वाकचौरेंना भाजपच्या कोट्यातून दिलेले साईबाबा संस्थानचे विश्वस्तपदालाही मुकावे लागणार आहे.