मुंबई - शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या विरोधात केंद्र सरकारचे धोरण असून त्याविरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनसह इतर केंद्रीय कामगार संघटनांनी उद्या (बुधवारी) देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणाच्या विरोधात देशभरात संतापाचे वातावरण सुरू असतानाच विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी देशभरात बुधवारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. यात राज्यातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांच्या प्रमुख ठिकाणी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जमून केंद्र सरकारचा निषेध करणार आहेत.