मुंबई- राज्यातील काही शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी आजपासून विशेष मोहीम राबवून त्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्त करावी. तसेच नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्त करा, कृषिमंत्र्यांचे आदेश - Pradhanmantri shetkari Samman yojna
सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी महसूल यंत्रणेशी समन्वय साधून योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर कराव्यात व शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. तसेच कोरोना संकटाच्या काळात 1 एप्रिल नंतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 2 हजार 441 कोटी रक्कम थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील 91 लाख 13 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात 5 हप्त्यात 6 हजार 949 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्यातील जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत त्यांचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी काल आढावा बैठक घेतली होती. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी सहसंचालक यावेळी उपस्थित होते. राज्यात 1 कोटी 52 लाख शेतकरी आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 4 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विशेष मोहीम राबवून 23 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान माहितीतील त्रुटी दूर करावी, असे निर्देश भुसे यांनी दिले आहे.
या कालावधीत सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी महसूल यंत्रणेशी समन्वय साधून योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रूटी दूर कराव्यात व शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. तसेच कोरोना संकटाच्या काळात 1 एप्रिल नंतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 2 हजार 441 कोटी रक्कम थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली.