परभणी- येथील जिल्हा रुग्णालयात काल रात्री उशिरा आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर काल संध्याकाळपर्यंत 6 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 405 एवढी झाली होती. मात्र, त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला, तर 183 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आता उर्वरित 209 रुग्णांवर कोरोना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधित मृत व्यक्ती (वय 35) ही परभणी तालुक्यातील शहापूर येथील असून तिचा काल रात्री उशिरा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील मृतांचा आकडा 13 झाला आहे. रुग्णास 12 जुलै रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 8 दिवस त्याच्यावर उपचार झाल्यानंतर काल रात्री त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. काल दिवसभरात 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर 8 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. अजूनही 42 स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी उपचारासाठी दाखल असलेल्या एकूण रुग्णांपैकी 2 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.