चंद्रपूर- जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे असे दिसून येत आहे. बुधवारी गेल्या 24 तासात 166 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 472 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 8 हजार 99 कोरोना बाधितांना बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 194 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. या मृतांमध्ये छोटा नागपूर परिसरातील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलेला 6 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तर, दुसरा मृत्यू रामनगर येथील सिंधी कॉलनी परिसरातील 70 वर्षीय पुरुषाचा झाला आहे. या रुग्णाला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तर, दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 179 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 170, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात आढळलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 65, पोंभुर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील 11, चिमूर तालुक्यातील 13, मुल तालुक्यातील 14, जिवती तालुक्यातील पाच, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच, नागभीड तालुक्यातील सहा, वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील 16, सावली तालुक्यातील पाच, सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील 10 तर नागपूर येथील एक अशा एकूण 166 जणांचा समावेश आहे.