नवी दिल्ली -अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर सोशल मीडियावर रामदेव बाबा यांच्याविरोधात मोहिम सुरु आहे. त्यांना अटक करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. अटकेवर प्रतिक्रिया देणारा रामदेव बाबा यांचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. "...अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता' ( 'त्यांचा बापही मला अटक करु शकत नाही) असे रामदेव बाबांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल... 'खैर, अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता'. सोशल मिडियावर गोंधळ घातला आहे. 'क्विक अरेस्ट रामदेव' असा ट्रेंड सुरू आहे. ते नेहमीच ट्रेंड चालवतात. कधी ठग रामदेव, कधी महाठग रामदेव तर कधी अरेस्ट रामदेव असा ट्रेंड चालवला जातो. त्यांना ट्रेंड चालवू द्या, आता आम्हीही ट्रेंड शिकलो आहोत, असे बाबांनी म्हटलंय.
रामदेव बाबा आणि आएमए वाद -
रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटले होते. अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. ही उपचारपद्धती म्हणजे मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. कोरोनावर उपचारामध्ये हायड्रोक्लोरिक्विन फेल झालं. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अॅलोपॅथी उपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे, असे ते म्हणाले होते. यावर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी पुन्हा वाद उकरून काढत टि्वट करून आयएमएला २५ प्रश्न विचारले होते. यातच रामदेव बाबांचा आणखी एक डॉक्टरांचा 'टर' उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
त्यानंतर आएमए आणि रामदेव बाबा यांच्यातील वाद वाढला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने रामदेव बाबा यांना कायदेशीर नोटीस बजावली. रामदेव बाबांनी येत्या 15 दिवसांच्या आत माफी मागितली नाही. तर त्यांच्यावर एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला जाईल, असे आयएमएने नोटीसमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा -डॉक्टरांची 'टर' उडवणारा रामदेव बाबांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल