हरिद्वार :गंगेत पदक विसर्जनासाठी निघालेले कुस्तीपटू उत्तराखंडमध्ये दाखल झाल्या होत्या. खेळाडूंनी आपली पदके हरिद्वार गंगेत विसर्जित करण्याच्या निर्णयाने संपूर्ण देशात वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते, अनेक सामाजिक संघटना ठिकठिकाणी खेळाडूंची वाट पाहत आहेत. दुसरीकडे, कुस्तीपटू त्यांना वाट्टेल ते करायला मोकळे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पदके गंगेत विसर्जित करण्याची घोषणा :कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर पॉक्सो कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतरही महिला कुस्तीपटू त्यांना अटक न केल्याने आंदोलन करत आहेत. आता त्यांनी आपले पदके गंगेत विसर्जित करण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर कुस्तीपटूं दिल्लीतून पदके घेऊन हरिद्वारमध्ये दाखल देखील झाले होते. मात्र, त्यांनी नंतर आपला निर्णय मागे घेतला आहे.
कुस्तीपटू निर्णय घेण्यास स्वतंत्र :हरिद्वारचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अजय सिंह यांनी फोनवर सांगितले की, 'कुस्तीपटू काहीही करण्यास स्वतंत्र आहेत. ते पदक पवित्र गंगेत विसर्जित करण्यासाठी येत असतील तर त्यांना रोखले जाणार नाही. तसेच पैलवानांच्या आगमनाचीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून तशा सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत.