महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Wrestlers Protest : साक्षी मलिकचे ट्विट - 'आंदोलन सुरूच राहणार, सर्व बातम्या खोट्या' - कुस्तीपटूंचे आंदोलन

कुस्तीपटू साक्षी मलिकने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्याच्या सर्व बातम्यांचे खंडन केले आहे. तसेच आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे तिने म्हटले आहे.

Wrestlers Protest
कुस्तीपटूंचे आंदोलन

By

Published : Jun 5, 2023, 4:21 PM IST

नवी दिल्ली : कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार घेण्याची घोषणा चुकीची असल्याचे साक्षी मलिकने म्हटले आहे. तसेच तिने प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांचेही खंडन केले आहे. याबाबत साक्षी मलिकने ट्विट करून माहिती दिली आहे. साक्षी मलिक रेल्वेत नोकरीत रुजू झाली आहे. मात्र आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे तिने सांगितले आहे.

साक्षी मलिकचे ट्विट : कुस्तीपटूंनी आंदोलनातून माघार घेतल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर साक्षी मलिकने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करत अशा बातम्या न चालवण्याचे आवाहन केले आहे. साक्षीने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आमच्यापैकी कोणीही मागे हटले नाही आणि हटणारही नाही. सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील जबाबदारीही पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका. - साक्षी मलिक

'आंदोलन सुरुच राहणार' : साक्षी मलिकनंतर बजरंग पुनियानेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट शेअर करून आपली भूमिका मांडली आहे. आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे बजरंग पुनिया याने म्हटले आहे. आमचे नुकसान करण्यासाठी या बातम्या पसरवल्या जात आहेत. आम्ही मागे हटलो नाही आणि आंदोलन मागे घेतले नाही. महिला कुस्तीपटूंनी एफआयआर मागे घेतल्याच्या बातम्याही खोट्या आहेत. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे, असे बजरंग पुनियाने म्हटले आहे.

23 एप्रिलपासून आंदोलन सुरु : भाजपचे खासदार आणि कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी देशातील नामवंत आणि पदक विजेते कुस्तीपटू 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत. कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंशी गैरवर्तन केल्याचा आरोप करून आंदोलन सुरू केले आहे. यासोबतच अनेक महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोपही लावले आहेत. अनेक पक्ष आणि संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिला. यानंतर 28 मे रोजी पोलिसांनी कुस्तीपटूंना हटवून जंतरमंतर येथील आंदोलनस्थळ रिकामे केले. तेव्हापासून या आंदोलनाबाबत विविध अंदाज बांधले जात होते.

हेही वाचा :

  1. Wrestler Protest : तर भारतीय कुस्ती परिषद निलंबित करू, कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीची जागतिक कुस्ती संघटनेकडून दखल
  2. Wrestler Protest In Delhi : कुस्तीपटूंना न्याय मिळेल का, दिग्गज खेळाडूंचा सवाल, प्रियंका गांधीही आंदोलकांना भेटल्या

ABOUT THE AUTHOR

...view details