नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू एक महिन्यापासून आंदोलन करत आहेत. रविवारी दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना अटक करत जंतरमंतरवरचे तंबू उखडून टाकले. याला उत्तर म्हणून राहुल गांधींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'राज्याभिषेक संपला - 'अहंकारी राजा' रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे!'
प्रियंका गांधींचे ट्विट : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, 'खेळाडूंच्या छातीवरील पदके ही आपल्या देशाची शान आहे. त्या पदकांसह खेळाडूंच्या मेहनतीमुळे देशाचा मान वाढतो. भाजप सरकारचा अहंकार एवढा वाढला आहे की, सरकार आपल्या महिला खेळाडूंचा आवाज निर्दयपणे पायदळी तुडवत आहे.
कुस्तीपटूंना जबरदस्तीने अज्ञातस्थळी पाठवले :23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आज नव्या संसद भवनाकडे शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. सकाळी 11.30 च्या सुमारास सर्व पैलवान जंतरमंतरहून निघाले, पण दिल्ली पोलिसांनी त्यांना आधीच बॅरिकेड केले होते. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पैलवानांना ताब्यात घेण्यात आले. कुस्तीपटूंना जबरदस्तीने बसमध्ये बसवून अज्ञातस्थळी पाठवण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळावरून कुस्तीपटूंच्या खाटा, गाद्या, कुलर, पंखे, ताडपत्रीही हटवल्या.
मल्लिकार्जुन खरगे यांचे कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्विट : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईवर ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, 'नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा अधिकार राष्ट्रपतींकडून काढून घेण्यात आला. महिला खेळाडूंना रस्त्यावर हुकूमशाही पद्धतीने मारहाण करण्यात आली! भाजप - आरएसएसच्या सत्ताधाऱ्यांचे तीन खोटे आता देशासमोर उघड झाले आहेत - 1) लोकतंत्र 2) राष्ट्रवाद 3) बेटी बचाव
हे ही वाचा :
- Wrestlers Protest : दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले, जंतरमंतरवर कलम 144 लागू
- Rahul Gandhi On Parliament Inauguration : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान राज्याभिषेक समजतात : राहुल गांधी
- Terrorists Killed in Manipur : मणिपूर हिंसाचारानंतर आतापर्यंत 30 दहशतवादी ठार, आसाम रायफल्सची कारवाई