नवी दिल्ली: गेल्या दिवसांपासून कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोप आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांना पदावरुन हटवून त्यांना अटक केली जावी, अशी मागणी भारतीय कुस्तीपटूंकडून केली जात आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना केंद्र सरकराने पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची माहिती दिली आहे. सरकारकडून आलेली ऑफर कुस्तीपटूंनी स्वीकारली आहे. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या घरी चर्चेसाठी पोहोचला आहे. दरम्यान सरकारकडून चर्चेसाठी आलेला प्रस्ताव कुस्तीपटूंनी स्वीकारला असून बृजभूषण शरण सिंह यांची अटकच झाली पाहिजे ही भूमिका ठाम असल्याचे कुस्तीपटू म्हणाले आहेत.
ट्विटमधून दिली माहिती : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. सरकारने पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान कुस्ती महासंघ ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी पुन्हा रेल्वेत आपली ड्युटी सुरू केली आहे. सर्व कुस्तीपटू या वर्षाच्या सुरुवातीपासून बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
पुन्हा चर्चेसाठी निमंत्रण : दरम्यान कुस्तीपटूंनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत सर्वकाही कायदेशीरपणे होईल, असे सांगितले होते. त्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने या बैठकीची माहिती ट्विट करुन दिली होती. शनिवारी रात्री कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिले असे पुनियाने सांगितले होते. या बैठकीनंतर माध्यमात आंदोलन मागे घेण्यात आले आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे खेळाडूंनी पुन्हा नोकरी जॉईन केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. त्यानंतर पुन्हा आंदोलनाने जोर धरला. यानंतर केंद्राकडून चर्चेसाठी पुन्हा निमंत्रण देण्यात आले.