हैदराबाद :डब्ल्यूएचओच्या मते 1980 पासून पोलिओ विषाणूच्या प्रकरणांमध्ये 99.9% घट झाली आहे. जागतिक पोलिओ दिवस दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी पोलिओ लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी जनजागृती केली जाते. पोलिओ निर्मूलनाच्या या लढ्यात, जे देश अजूनही पोलिओशी झुंजत आहेत, त्यांना पाठिंबा दिला जातो. पोलिओ अजूनही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे या दिवशी पोलिओसंबंधी आवश्यक माहिती घेणं आवश्यक आहे. भारताला जानेवारी 2014 मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आलं होतं. हे केवळ प्रभावी लसींमुळेच शक्य झाले आहे. पोलिओ दिनाविषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
पोलिओचा इतिहास : जोन्स साल्क यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी त्यांचा वाढदिवस २४ ऑक्टोबर रोजी 'जागतिक पोलिओ दिवस' म्हणून साजरा केला जातो. ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी पहिली टीम सुरू केली जी निष्क्रिय पोलिओ लस तयार करण्यात यशस्वी झाली. हा दिवस जगभरात साजरा केला जातो. अनेक व्यवसाय, समुदायाचे नेते आणि व्यावसायिक लोक पोलिओ जागृतीसाठी आपली भूमिका बजावतात. सर्व देशांचे मुख्य लक्ष्य देशातून पोलिओचं उच्चाटन करणं आहे.
पोलिओबद्दल या गोष्टी जाणून घ्या : हा एक अतिशय जलद संसर्गजन्य रोग आहे जो मुख्यतः लहान मुलांना प्रभावित करतो. हा रोग थेट मज्जासंस्थेवर हल्ला करतो, म्हणून तो घातक रोगांच्या श्रेणीत येतो. यामुळं तो दूर करणं अधिक महत्त्वाचं बनतं.