जबलपूर MP High Court :खंडवा येथील एका 40 वर्षीय महिलेनं मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यामध्ये तिनं इंदौर तुरुंगात असलेल्या आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवून मुलाला जन्म देण्याची परवानगी मागितली आहे. महिलेच्या पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळं तो तुरुंगातून बाहेर पडू शकत नाही. दरम्यान, महिलेचं म्हणणं आहे की तिला आई व्हायचंय. मात्र पती तुरुंगात असल्यानं तिचा हा अधिकार हिरावून घेण्यात आला.
अपत्यप्राप्तीसाठी कैदी पतीशी संबंध ठेवण्याचा अर्ज :महिलेच्या वतीनं वकील वसंत डेनियल म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार, प्रत्येकाला मुल जन्माला घालण्याचा अधिकार आहे. तसंच महिलेच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं की, माझं वय 40 वर्षे असून माझा पती गेल्या 7 वर्षांपासून तुरुंगात आहे. पतीला भारतीय दंड संहितेच्या कलम 351 आणि 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. या परिस्थितीत त्याला (पती) तुरुंगातून बाहेर येणं शक्य नाही. त्यामुळं माझा आई बनण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. कलम 21 मला माझ्या कुटुंबाला पुढं नेण्याचा अधिकार देते. त्यामुळं मला माझ्या पतीद्वारे मुल जन्माला घालण्याची संधी दिली जावी.
- वृद्धत्वामुळे आई होऊ शकत नाही : या खटल्यात सरकारच्या वतीने बाजू मांडणारे वकील संतोष कठर म्हणाले की, या प्रकरणात तक्रारदार महिलेला सवलत देता येणार नाही. कारण तक्रारदार महिला वृद्ध आहे. ती आता आई होऊ शकत नाही.