नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत कोरोना लसीकरण आणि औषधांची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित केल्याचे मुख्यमंत्री बॅनर्जी सांगितले. तसेच पश्चिम बंगालचे नाव बदलावे, ही प्रलंबित मागणीही केल्याचे त्यांनी सांगितले.
पेगाससच्या हेरगिरीचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गाजत आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी अपेक्षा ममता बॅनर्जी यांनी केली. सर्वोच्च न्यायालयानेही पेगाससबाबत देखरेख करावी, अशी मागणी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे नाव बदलून बंगाल करण्याची मागणी केली आहे. त्यावर पंतप्रधानांनी पाहू, असे उत्तर दिल्याचे मुख्यमंत्री ममता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा-कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव आज सांयकाळी जाहीर होणार - अर्जुन सिंह
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता आणि पीएम मोदी यांची थेट असणारी ही पहिलीच भेट होती.
शहीद दिनाला 23 जुलैला ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर केली होती टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नुकतेच पेगासस हेरगिरी प्रकरणावरून टीका केली होती. पेगासस हेरगिरी ही वॉटरगेटपेक्षाही भंयकर आहे, असेही त्यांनी म्हटले होते. यापूर्वी 21 जुलै रोजी शहीद दिनाला संबोधित करताना ममता यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. भाजपा सरकारने देशातील संघराज्य पद्धती नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच भाजपाला सत्तेतून बाहेर हाकलत नाही, तोपर्यंत 'खेला' होणार, असे त्या म्हणाल्या होत्या. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे. केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल, असेही त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा-ऑगस्ट महिन्यात तब्बल 15 दिवस बॅंका राहणार बंद, जाणून घ्या तारखा...