कोलकाता - पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार टीका करताना, देशाला प्लास्टर करण्याची गरज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त केलेल्या संबोधनादरम्यान व्यक्त केली. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे. केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत 'खेला' होणार, असे आव्हानच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. तसेच केंद्र सरकार हेरगिरीसाठी करदात्याचा पैसा खर्च करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहीद दिन समारंभाचे तृणमूलच्या वतीने देशभरात प्रसारण करण्यात आले. देशपातळीवर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तृणमूलच्या रणनितीचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
संबोधनाच्या सुरवातील ममतांनी काळा पैसा, भष्ट्राचार,गुंडागर्दी आणि एजन्सीविरोधात लढा दिल्याबद्दल पश्चिम बंगालच्या नागरिकांचे अभिनंदन केले. बंगालवासीयांच्या आर्शिवार्दाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत टीएमसीने पुन्हा सत्ता मिळवली असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच 16 ऑगस्ट हा 'खेला दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार असून गरीब मुलांना फुटबॉल वाटण्यात येतील, ही माहिती त्यांनी आपल्या संबोधनादरम्यान दिली.