कोलकाता - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर शुक्रवारी दगडफेक करण्यात आली होती. यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी अज्ञाताविरोधात दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. जे. पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.
जे. पी नड्डा यांच्या बंगाल दौऱ्यातील सुरक्षाव्यवस्थेवरून बंगालचे भाजपा प्रमुख दिलीप घोष यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहले आहे. नड्डा यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्था पुरेशी नव्हती. त्यांच्या कार्यक्रमावेळीही पोलीसांनी हलगर्जीपणा केला. काही कार्यक्रमात तर सुरक्षा व्यवस्थाही नव्हती. पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत घोष यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहले.
बंगामध्ये अराजकता आणि असहिष्णूता -
बुलेट प्रूफ गाडी असल्यामुळे सुरक्षित राहिल्याचे प्रतिक्रिया ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर जे. पी नड्डा यांनी दिली होती. ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात बंगामध्ये अराजकता आणि असहिष्णूता पसरली आहे. टीएमसीच्या गुंडांनी लोकशाहीचा गळा घोटण्यात कोणतीही कमी ठेवली नाही, अशी टीका त्यांनी बॅनर्जींवर केली होती.