वाराणसी -पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला संसदीय मतदारसंघ वाराणसीला येत्या दोन दिवसांमध्ये भेट देणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. वाराणसी दौऱ्यामध्ये पंतप्रधान सारनाथला भेट देणार आहेत. गौतम बुद्ध यांनी आपला पहिला उपदेश याच ठिकाणी दिला होता. यातच बनारसमधील बच्चे लाल मौर्या या वीणकराने गौतम बुद्ध यांचा उपदेश असलेले वस्त्र मोदींना भेट म्हणून देण्यासाठी खास तयार केले आहे. त्यावर 'बुद्धम् शरणम् गच्छामि', असे लिहिलेले आहे. तसेच वस्त्रावर बोधी वृक्षाचे पानही आहे. गौतम बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली 'बौद्धत्व' प्राप्त झाले होते. म्हणून त्या वृक्षाला 'बोधी वृक्ष' असे म्हणतात.
बौद्ध धर्मात प्रचलित रंगांचा वापर करून मेहरूण रंगाच्या कपड्यावर पिवळ्या रेशीम धाग्याने बोधी वृक्षाचे पान आणि बुद्धम् शरणम् गच्छमिचा संदेश लिहला आहे. पंतप्रधान देवदिवाळीच्या पर्वाला वाराणसीमध्ये येत आहेत. वाराणसीमध्ये देवदिवाळी उत्सव दरवर्षी साजरा होतो. प्रत्येक वर्षी हजारो पर्यटक वाराणसीला येतात आणि नौकाविहारचा आनंद घेतात. नाविकांच्या वर्षभरातील कमाईचा एक मोठा हिस्सा यातून येतो.