नवी दिल्ली -महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूरसह देशातील 30 विधानसभा आणि 3 लोकसभा जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात येत असून आज सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकींचे 2 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. 14 राज्यातील 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
पश्चिम बंगालमध्ये चार, आसाममध्ये पाच, मेघालय, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी तीन जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तर राजस्थान, बिहार आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन आणि मिझोराम, तेलंगना, नागालँड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि हरियाणात प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे. तसेच लोकसभा पोटनिवडणूक ही दादरा आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्य प्रदेशातील खांडवा येथे प्रत्येकी एका जागेवर म्हणजेच एकूण तीन ठिकाणी होत आहेत.
महाराष्ट्र -
महाराष्ट्रातील देगलूर पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची लढत असून भाजपाने सुभाष साबणे आणि काँग्रेसने जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. साबणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून ते मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती.
पश्चिम बंगाल -
पश्चिम बंगालमध्ये कूचबिहारमधील दिनहाटा, नादियामधील शांतिपूर, उत्तर 24 परगणामधील खर्डा आणि दक्षिण 24 परगणामधील गोसाबा येथे विधानसभा पोटनिवडणूक घेण्यात येत आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) हे या पोटनिवडणुकीत प्रमुख दावेदार आहेत.
आसाम -
आसाममध्ये पाच विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. मतदारसंघ गोसाईगाव, भबानीपूर, तामुलपूर, मारियानी आणि थौरा या पाच विधानसभा जागांवर सत्ताधारी भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे.
मेघालय -
मावरिंकनेंग, मावफ्लांग आणि राजाबाला या तीन जागांवर निवडणूक होत आहे. येथे सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे.
बिहार -
बिहारमधील तारापूर आणि कुशवेश्वर अस्थान या दोन जागांसाठी एकूण 17 उमेदवार पोटनिवडणूक लढत आहेत.
कर्नाटक -
राज्यातील सिंदगी आणि हनागल विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत.