तिरुवनंतपुरम : केरळच्या विझिंजम भागात रविवारी रात्री अडानी बंदर प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान (Kerala protest against adani port project) झालेल्या हिंसक संघर्षांप्रकरणी 3000 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vizhinjam police station attack). पोलिसांनी सांगितले की, पोलिस स्टेशनची तोडफोड आणि पोलिस कर्मचार्यांना जखमी केल्याबद्दल 3000 'ओळखण्यायोग्य व्यक्तीं' विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारात तब्बल 36 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी राज्य पोलिसांनी विझिंजाम येथील हिंसाचाराबद्दल मेट्रोपॉलिटन आर्चबिशप थॉमस जे नेट्टो आणि परेरा यांच्यासह किमान 15 लॅटिन कॅथोलिक धर्मगुरूंविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.
पोलिस स्टेशनची तोडफोड केली : अतिरिक्त पोलीस महासंचालक एमआर अजित कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पोलीस स्टेशनची तोडफोड करणाऱ्या जमावाने रविवारी संध्याकाळी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुमारे 36 पोलीस कर्मचाऱ्यांना तिरुअनंतपुरममधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुमार म्हणाले, "संध्याकाळी पोलिस स्टेशनमध्ये जमाव जमला आणि दुसर्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही लोकांच्या सुटकेची मागणी केली. त्यांनी पोलिस स्टेशनची तोडफोड केली आणि अधिकार्यांवर हल्ला केला. एका SI च्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे”. कुमार म्हणाले की, पोलिसांच्या वतीने कोणतीही चिथावणी दिली गेली नाही. ते म्हणाले की अधिकारी जास्तीत जास्त संयम ठेवून या प्रदेशात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करीत आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागले तेव्हा पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. सुमारे 600 पोलीस आधीच या प्रदेशात तैनात करण्यात आले होते आणि त्यांच्यात आणखी 300 जोडले गेले आहेत, असेही कुमार म्हणाले.