उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarkashi Silkyara Tunnel Collapse :10दिवसांनंतर आज (21 नोव्हेंबर)पहिल्यांदाच उत्तरकाशी सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा व्हिडिओ देशासमोर आलाय. सोमवारी (20 नोव्हेंबर) रात्री उशिरा सिलक्यारा बोगद्यात अन्न, औषधं आणि ऑक्सिजनसाठी 6 इंच रुंद 57 मीटर लांबीचा पाईप टाकण्यात आला. त्याच पाईपमधून एन्डोस्कोपिक कॅमेराही आत पाठवण्यात आला होता, ज्यातून आज सकाळी बोगद्यातले पहिले फुटेज समोर आले आहे. सर्व 41 कामगारांची मोजणी करण्यात आली असून सर्व सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतय. ही छायाचित्रं आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळालाय. तसंच यावेळी वायफाय वॉकीटॉकीद्वारे कामगारांशी संपर्कही साधण्यात आला.
काय म्हणाले कामगार :बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे फोटो आणि व्हिडिओ आज पहिल्यांदाच समोर आले आहेत. यावेळी कामगारांशी बातचित देखील करण्यात आली. ज्यात कामगारांनी आम्हाला लवकर बोगद्यातून बाहेर काढण्यात यावं, अशी विनंती केली आहे. सोमवारी रात्री प्रथमच या पाईपद्वारे कामगारांना गरम खिचडी 24 बाटल्यांमध्ये पॅक करून पाठवण्यात आली. त्यासोबत त्यांना सफरचंद, संत्री आणि लिंबाचा रसही पाठवण्यात आलाय.