वासुदेव यांचे मूळ घराणे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील आहे. वासुदेव यांचे आजोबा अनंतराव फडके हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन करण्याआधी त्यांनी दोन ते तीन दिवस इंग्रजांशी लढा दिला. कर्नाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण (रायगड) गावी फडके कुटुंब वास्तव्य आले. अनंतराव यांचे पुत्र बळवंतराव यांना शिरधोणमध्ये 4 नोव्हेंबर 1845 रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. हेच वासुदेव बळवंत फडके. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले क्रांतिकारक असलेल्या वासुदेव बळवंत फडके यांचं 17 फेब्रुवारी 1883 रोजी निधन झाले. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर जन्मलेले वासुदेव बळवंत फडके हे एका अत्यंत सामान्य कुटुंबातील होते.
पुणे हीच कर्मभूमी : वासुदेव यांचे प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५–६० या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वासुदवे यांचे माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या तीन ठिकाणी झाले. वासुदेव यांनी पाचवीनंतर इंग्रजीचे शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली. वासुदेव यांनी पहिली नोकरी जी. आय्. पी. रेल्वेमध्ये केली. वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांपुढे उगाच विनम्र होण्याची सवय त्यांना नसल्याने रेल्वेमधली नोकरी लगेच सुटली. त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही याच स्वभावामुळे फार दिवस टिकली नाही. अखेर १८६३ साली वासुदेव लष्कराच्या हिशेबी खात्यात नोकरीला लागले. पुढील १६ वर्षे म्हणजेच २१ फेब्रुवारी १८७९ पर्यंत ते तिथेच कामाला होते. २१ फेब्रुवारी १८७९ रोजी त्यांनी लष्कारविरोधात बंड पुकारले. १८६५ साली त्यांची मुंबईहून पुण्यात बदली झाली. पुढे पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली.
क्रांतिकारक गटाची स्थापना : ब्रिटीश राजवटी दरम्यान फडके हे शेतकरी समाजाच्या दुर्दशाने निराश झाले होते. त्यांचा असा विश्वास होता की ‘स्वराज्य’ हाच यावरील उपाय आहे. भारताला स्वराज्य मिळावे, याकरिता राजकीय प्रचारासाठी दौरा करणारे ते पहिले भारतीय होते. 1875 मध्ये त्यांनी ब्रिटीशांचा पाडाव करण्यासाठी महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल आणि धनगर समाजाच्या मदतीने रामोशी नावाच्या एक क्रांतिकारक गटाची स्थापन केली. 20 फेब्रुवारी 1879 रोजी फडके यांनी आपले सहकारी विष्णू गद्रे, गोपाळ साठे, गणेश देवधर आणि गोपाळ हरी कर्वे यांच्यासह पुण्यापासून आठ मैलांच्या उत्तरेला असणाऱ्या लोणी गावाबाहेर 200 तरूणांचं बलवान सैन्य दलाची स्थापना केली. बहुधा ही भारताची पहिली क्रांतिकारक सेना होती. त्यांच्या सशस्त्र संघर्षासाठी निधी गोळा करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फडके आणि त्यांच्या साथीदारांनी एका श्रीमंत इंग्रजी व्यावसायिकावर छापा टाकला होता.