भोपाळ : भोपाळहून निजामुद्दीनकडे जाणाऱ्या वंदे भारत रेल्वेला आग लागल्याची घटना घडली आहे. कुरवई केथोरा येथे ही रेल्वे पोहोचली असताना रेल्वेला आग लागली. वंदे भारत रेल्वेच्या सी14 कोचला(डब्ब्याला) आग लागली होती. या डब्ब्याला आग लागल्याच समजताच रेल्वेतील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. रेल्वेच्या कोच सी 14 मध्ये असलेल्या बॅटरीमुळे आग लागली. अग्निशमन दलाकडून आग शमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ट्रेनला आग लागल्याचे असे कळाले : ट्रेन क्रमांक 20171 (वंदे भारत ट्रेन) आज सोमवारी पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी भोपाळच्या राणी कमलापतीहून दिल्लीच्या निजामुद्दीनकडे निघाली होती. कुरवई बीनाजवळील केथोरा येथे ही रेल्वे पोहोचली तेव्हा सी-१४ डब्यातून धूर निघत असल्याचे दिसले. धूर का निघत आहे याची चौकशी केली तेव्हा सीटाखाली आग लागल्याचे दिसून आले. यावेळी रेल्वेच्या सी-14 कोचमध्ये जवळपास 36 प्रवासी होते. डब्ब्याला आग लागल्याची माहिती होताच प्रवासी सैरवैर पळू लागले. काही मिनिटांच्या गोंधळानंतर रेल्वे थांबवण्यात आली. ट्रेन थांबल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग शमवण्याचे प्रयत्न करत आहे. वंदे भारत ट्रेनच्या C-14 कोचमध्ये असलेल्या एका प्रवाशाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली.