पणजी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय ठरू शकत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होते हे आपण मागील मार्च, एप्रिल महिन्यात पाहिले आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी लसिकरण, योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज व्यक्त केले.
लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त
पर्वरी येथील सचिवालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सावंत म्हणाले, की 'काही लोक सरकार लॉकडाऊन करणार म्हणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारचा असा कोणताही विचार नाही. मागच्या मार्च-एप्रिल महिन्यात केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. सर्व उद्योगधंदे थांबले. तसेच वस्तू आणि सेवा करही मिळणे बंद झाला. कामगार गावाला निघून गेले. काही कामगारांसाठी कामगार शिबिरे (लेबर कॅम्प) आयोजित करावी लागली'.
कोरोना रोखण्यासाठी लसिकरण हाच उपाय
लॉकडाऊनमुळे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी लसिकरण हाच उपाय आहे. मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर राखले पाहिजे. त्याबरोबरच लोकांनी आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे, असे सावंत म्हणाले.
सीमेवर कोणतीही बंधने नाहीत
सार्वजनिक ठिकाणी मास्क अथवा शारीरिक अंतर राखणे यांचे पालन केले होते की नाही हे पाहण्यासाठी आणि त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी पोलिसांना दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघनाबद्दल एकाच व्यक्तीला अनेकदा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी त्यांना आवाहन करण्यात येत आहे. या वयोगटातील सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्यापेक्षा कमी वयाचे पर्यटन व्यवसायिक आणि माध्यमांचे प्रतिनिधी यांना लसीकरण कशा प्रकारे करता येईल? याचा सरकार विचार करत आहे. याकरिता केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. जर 45 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी लसिकरण करून घेतले तर ते 50 होईल. असे असले तरीही नाईट कर्फ्यु अथवा लॉकडाऊन केले जाणार नाही. तसेच सीमेवर कोणतीही बंधने घालण्यात आली नाहीत. अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, यांची सरकार काळजी घेत आहे, असेही मुख्यमंत्री सावंतांनी म्हटले.
दरम्यान, गुंडगिरी रोखण्यासाठी राज्यभरातील 60 गुंडावर तडीपारीची प्रक्रिया सुरू आहे. काहींना जिल्ह्यातून तर काहींना राज्यांतून तडीपार करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी,बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात- रामदास आठवले
हेही वाचा -मिनी लॉकडाऊन इफेक्ट : पुणे शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट