उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarkashi Tunnel Collapsed :उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्गावरील सिलक्यारा बोगदा दुर्घटनेकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून फोनवरून माहिती घेत आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मजुरांना वाचवण्यासाठी ह्यूम पाईप घटनास्थळी पोहोचले आहेत. तसंच बोगद्यात अडकलेल्या मजुरांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
- ह्युम पाईप्स घटनास्थळी पोहोचले : बांधकामाधीन सिलक्यारा बोगद्यात ह्यूम पाईपचा वापर केला जात असला तरी ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्या दिवशी बोगद्याच्या संवेदनशील भागात ह्युम पाईप टाकण्यात आले नव्हते. बोगद्याच्या आत ह्यूम पाईप टाकले असते, तर आतापर्यंत कामगारांना पाईपमधून बाहेर काढण्यात आलं असतं.
बोगद्याजवळ बांधले तात्पुरते रुग्णालय :सिलक्यारा बोगद्यामध्ये दरड कोसळल्याच्या घटनेनंतर आरोग्य विभागानं येथे सहा खाटांचे तात्पुरते रुग्णालय तयार केले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आरसीएस पनवार यांनी सांगितलं की, घटनास्थळाजवळ तात्पुरतं रुग्णालय उभारण्यात आलं आहे. याध्ये ऑक्सिजन सिलिंडरही बसवण्यात आलेत. या रुग्णालयात 10 रुग्णवाहिकांसह 24 तास वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे.
- जाणून घ्या कसा झाला अपघात :रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याच्या सिल्क्यरा तोंडात 230 मीटर आत ढिगारा पडला. काही वेळातच 30 ते 35 मीटर परिसरात पहिला हलका ढिगारा पडला, त्यानंतर अचानक मोठा ढिगारा आणि दगड पडू लागले. त्यामुळे बोगद्यात काम करणारे 40 मजूर आत अडकले.