हैदराबाद :यूपीआय आणि नेटबँकींगचा मोठा फटका एसबीआयच्या सेवेला बसल्याचे आज सकाळी दिसून आले आहे. एसबीआयची सेवा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या आहेत. सर्व्हर डाऊन असल्याने अनेक ग्राहकांना आपल्या क्रेडीट कार्डचे पेमेंट करण्यात अडचण येत असल्याची ग्राहकांनी एसबीआयकडे तक्रार केली आहे. त्यामुळे यूपीआय आणि नेटबँकींगचा एसबीआय सेवेला फटका बसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
काय आहे प्रकरण :स्टेट बँक ऑफ इंडीयाची सेवा मागील तीन तासापासून विस्कळीत झाल्याची तक्रार ग्राहक करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी बँकेकडे तक्रारीचा पाडाच वाचला आहे. तर काही ग्राहक आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबतची तक्रार करत आहेत. एसबीआयने आज दुपारपासून यूपीआय आणि योनो अॅपवर सेवा बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. ग्राहकांनी आज सकाळीच आपले पेमेंटचे काम करायला सुरुवात केली. त्यामुळे एसबीआयच्या सर्व्हरवर मोठा ताण आल्याचे दिसून आल्याने सेवा ठप्प झाली आहे.
यूपीआय योनो पेमेंट राहणार बंद :सध्या मार्च एन्ड असल्यामुळे बँकेने आपले यूपीआय आणि योनो अॅप दुपारी 01.30 ते 04.30 वाजतापर्यंत बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या प्रलंबित देणी करण्यासाठी एकच गर्दी केल्याने आज सकाळपासून बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याची तक्रार ग्राहक करत आहेत. सध्या मार्च एन्ड असल्याने बँकेचे वार्षिक ताळेबंदाचे काम सुरू आहे.