रायबरेली (उत्तर प्रदेश) :आताचा जमाना ऑनलाईनचा आहे. या जमान्यात गुन्हेगार देखील ऑनलाईन शिकून गुन्हे करतो आहे.आता असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून समोर आले आहे.येथे काही बदमाशांनी युट्युबवरील व्हिडिओची मदत घेऊन बनावट नोटा छापल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी 99 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. चौकशीत तरुणांनी सांगितले की, ते यूट्यूबवरून बनावट नोटा छापायला शिकले. त्यानंतर दोघांनी बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी जत्रेतून पकडले : मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यात जिल्ह्यातील लालगंज भागातील ऐहार गावात असलेल्या बलेश्वर शिव मंदिराबाहेर जत्रेचे आयोजन केले जाते. येथे शेकडो भाविक दर्शनासाठी आणि जत्रेला भेट देण्यासाठी येतात. काल पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, जत्रेत दोन तरुण बनावट नोटा वापरण्याचा प्रयत्न करणार आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने दोन्ही तरुणांना जत्रेतून पकडले आणि त्यांच्याकडून 99,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
यूट्यूबवरून बनावट नोटा बनवायला शिकले : पियुष वर्मा आणि विशाल अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही मित्र आहेत. ते यूट्यूबवरून बनावट नोटा बनवायला शिकले. दोघांनी प्रिंटर आणि स्कॅनरच्या मदतीने घरीच नोटा छापायला सुरुवात केली. दोघेही जत्रेत या नोटा चालवण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान, पोलिसांनी त्यांना पकडले.
दोघांकडून प्रिंटर आणि स्कॅनर जप्त : या संदर्भात लालगंजचे सीओ महिपाल पाठक यांनी सांगितले की, खबऱ्याच्या माहितीवरून दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. दोघेही किरकोळ दुकानदारांना बनावट नोटा देऊन त्यांच्याकडून सामान खरेदी करायचे. दोघांकडून प्रिंटर आणि स्कॅनर जप्त करण्यात आला आहे. दोघांवरही कायदेशीर कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात येत आहे.
हेही वाचा :
- Thief Arrested From MP: महाराष्ट्रातील मंदिरांच्या दानपेट्यांवर डल्ला मारणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून अटक
- Tiger Poaching Case Gondia: वाघाची शिकार करून कातडी, अवयवांची तस्करी; २० सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई
- Nashik Crime News : नाशिकमध्ये एटीएमचं गेलं चोरीला!, पहा सीसीटीव्ही फुटेज