नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा : आपले प्रेम मिळवण्यासाठी बॉर्डर ओलांडून भारतात पोहोचलेल्या सीमा हैदरच्या अडचणी आता वाढल्या आहेत. यूपी एटीएसने सीमा आणि तिचा प्रियकर सचिन यांची चौकशी सुरू केली आहे. एटीएसने सीमा, प्रियकर सचिन मीना आणि सचिनचे वडील नेत्रपाल यांना सोमवारी चौकशीसाठी नोएडाला घेऊन गेले आहे. तेथे तिघांचीही चौकशी सुरू आहे.
या मुद्यांवर तिची चौकशी केली जाईल : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएस 10 दिवसांपासून सीमाच्या बोलण्याचे तसेच तिच्या राहणीमानाचे विश्लेषण करत होते. ती खरोखर कोण आहे? तिने पाकिस्तानात काय केले? ती भारतात कशी आली? तिला इथे येण्यास कोणी मदत केली? या मुद्यांवर तिची चौकशी केली जाईल. गरज भासल्यास तिला लखनऊच्या मुख्यालयातही आणण्यात येणार आहे. दुसरीकडे, नोएडा पोलिसांनी मात्र यूपी एटीएसच्या चौकशीवर मौन बाळगले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून ते कोतवालपर्यंत कोणीही याप्रकरणी काहीही सांगायला तयार नाही.
13 मे रोजी नेपाळमार्गे भारतात आली : पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी सीमा 13 मे रोजी नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात पोहोचली. त्यानंतर ती राबुपुरा येथील सचिनच्या घरी राहू लागली. तिने तिच्या चार मुलांनाही सोबत आणले आहे. सचिनने तिला आणि तिच्या चार मुलांना सुमारे दीड महिना रबुपुरा येथील भाड्याच्या घरात ठेवले. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळाली. शोध सुरू होताच ती मुले आणि सचिनसह तेथून पळून गेली. नंतर नोएडा पोलिसांनी तिला, तिच्या प्रियकराला आणि प्रियकराचे वडील नेत्रपाल यांना हरियाणातील फरिदाबाद येथून अटक करून तुरुंगात पाठवले. सध्या जामीन मिळाल्यानंतर ती रबुपुरा येथे सचिनच्या घरी राहत आहे.