नवी दिल्ली - संजय राऊतांप्रमाणे उद्धव ठाकरेही जेलमध्ये जाणार असा गोप्यस्फोट नारायण राणेंनी केला आहे. उद्धव ठाकरे कधीच खरे बोलत नाहीत. उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा अशी जहरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. ते आज गुरुवार (दि. 22 सप्टेंबर)रोजी मुंबईत आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Narayan Rane Press Conference ) दरम्यान, आपल्याला मंत्रीपद मिळू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना 10 वेळा फोन केला, असा खळबळजनक आरोपही राणे यांनी यावेळी केला आहे.
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाढीसाठी कधी संघर्ष केला का? - उद्धव ठाकरे यांनी काल गटनेत्यांचा मेळावा घेतला होता. यात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. याला उत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे निराशेच्या भावनेतून उद्धव ठाकरे यांनी भाषण केले आहे. शिवसेनेचा जन्म झाला तेंव्हा उद्धव ठाकरे 6 वर्षाचे होते. ते 1999 मध्ये पक्ष कार्यालयात आले. मी मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंना वाटले ते सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात. उद्धव ठाकरेंनी पक्ष वाढीसाठी कधी संघर्ष केला का? असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
खरं कधी बोलत नाही - गद्दारांना सत्तेचे दूध पाजले असे उद्धव म्हणतात, मग सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप कोणी खाल्ल, असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंची औकात आहे का? असे म्हणत हिंदुत्वासाठी कोणते काम केले? असा थेट प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईवर गिधाडे फिरत असल्याची उपमा उद्धव ठाकरे यांनी दिली. पण उद्धव ठाकरे स्वत: एक लबाड लांडगा आहेत. किती खोटं बोलतो. खरं कधी बोलत नाही. काल परवापर्यंत अमित शाहांना फोन करून मला भाजपमध्ये घेऊ नये यासाठी प्रयत्न करत होता, असा एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी गंभीर आरोप केला आहे.
हा जगातला 'ढ' माणूस आहे -'370 कलम रद्द करणारे आमचे अमित शाह हे संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना असे गिधाड वैगरे म्हणताना लाज वाटत नाही? भाजपचा हात धरुन, मोदींच्या नावे प्रचार करुन खासदार, आमदार निवडून आणले. या उद्धव ठाकरेंची दहा आमदार आणि पाच खासदार निवडून आणण्याची ताकद नाही. काय बोलतो हा असा ऐकेरी उल्लेखही त्यांनी केला आहे. 'मुंबई महानगरापालिका धुतली यांनी, मुंबईकरांचे शोषण केले याने असही ते म्हणाले आहेत.
तू नखाएवढा पण नाही - एवढ्या वर्ष महानगरपालिका यांच्याकडे. पण यांनी मुंबई बकाल केली. बेस्टमध्ये वेळेत पगार नाही, महानगरापालिकेत पगार नाही. डबघाईला आणल्या दोन्ही संस्था. काही येत नाही याला. हा जगातला 'ढ' माणूस आहे. एवढा 'ढ' माणूस मी पाहिला नाही. दोन वाक्य सांगितली की, उद्धवजी हे बोला हा.. पण हा बोलतो काही तरी भलतंच. सगळी दुसऱ्याकडून कामं करुन घेतली याने. त्यामुळे मोदी वैगरेंवर बोलू नको. तुला जड जाईल, तू नखाएवढा पण नाही.' अशी थेट आव्हानात्मक टीका नारायण राणे यांनी केली आहे.