नवी दिल्ली : भारत जोडो यात्रा संपल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी काही दिवसांच्या इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले आहेत. तिथल्या केंब्रिज विद्यापीठात त्यांनी व्याख्यानेही दिली आहेत. राहुल यांनी आपल्या व्याख्यानात सर्व मुद्द्यांचा उल्लेख केला. पेगासस हेरगिरीचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, माझ्या फोनमध्ये पेगासस सॉफ्टवेअर आहे. याद्वारे माझी हेरगिरी करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारला घेरून अनेक आरोपही त्यांनी केले. त्याचवेळी आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सफाया:राहुल यांच्यावर हल्लाबोल करताना भाजप नेते अनुराग ठाकूर म्हणाले की, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस पक्षाचा देशातून सफाया होत असल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकांचे निकाल काय होतील हे काँग्रेसला आधीच माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला. पेगासस मुद्द्यावर राहुल गांधींच्या वक्तव्यावरही ते म्हणाले की, पेगासस राहुल गांधींच्या मोबाईलमध्ये नसून त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही.