तिरुपती : दक्षिण प्रादेशिक समितीच्या बैठकीसाठी(Southern Zonal Council meeting) गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) तिरुपती दौऱ्यावर आले आहेत. दक्षिण प्रादेशिक समितीची बैठक रविवारी पार पडणार असून या बैठकीला दक्षिणेकडील राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. बैठकीपूर्वी तिरुपतीत दाखल झाल्यानंतर शाह यांनी येथील मंदिरात(Tirumala temple) येऊन भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले.
जगन मोहन रेड्डींनी केले स्वागत
अमित शाह यांचे शनिवारी सायंकाळी तिरुपतीतमध्ये आगमन झाले. यावेळी विमानतळावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शाह हे रस्ते मार्गाने तिरुमला पद्मावती विश्रामगृहाकडे गेले. तिथे विश्रांती घेतल्यानंतर शाह दर्शनासाठी तिरुमला मंदिरात आले. यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डीही त्यांच्यासोबत होते. दोघांनी मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर येथील पुजाऱ्यांनी दोघांना प्रसाद तसेच भगवान बालाजी यांचे छायाचित्र आशीर्वाद म्हणून दिले.