नवी दिल्ली -केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची चर्चा सुरू आहे. कारण, गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील आघाडीच्या नेत्यांसह मंत्र्यांच्या दोन बैठकी घेतल्या आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान आणि कर्नाटकचे भाजपचे नेते सुरेश अनगडी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याने रिक्त झालेल्या मंत्र्यांच्या जागा सरकारला भराव्या लागणार आहेत.
सध्या, केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांकडे विविध जबाबदारी आहेत. त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. माध्यमातील वृत्तांनुसार उद्योग आणि वाणिज्य, कायदा, कृषी, मानव संसाधन, नागरी विमान वाहतूक, स्टील आणि अन्न प्रक्रिया उद्योग या विभागांचा फेरबदलांमध्ये समावेश होऊ शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांमध्ये समावेश होऊ शकतो, अशा २६ नावांची यादी ईटीव्ही भारतला मिळाली आहे. या यादीत ज्योतिरादित्य सिंदिया, वरुण गांधी, कैलाश विजयवर्गीय, दिनेश त्रिवेदी, सरबननंदा सोनोवल आणि पशुपती पारस यांचा समावेश आहे.
हेही वाचा-अलविदा 'फ्लाइंग सिख'! 'अशी' राहिली महान धावपटू मिल्खा सिंग यांची कारकिर्द...
जाणून घ्या, मंत्रिमंडळात समावेश होण्याची चर्चा असलेल्या नेत्यांचा परिचय
- ज्योतिरादित्य सिंदिया- काँग्रेसची सत्ता असताना केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेले सिंदिया हे भाजपमध्ये मार्च २०२० मध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस सोडल्याने मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सत्ता गमाविली आहे.
- वरुण गांधी- वरुण गांधी हे मनेका गांधी व दिवंगत संजय गांधी यांचे पुत्र आहेत. त्यांनी तीन वेळा पीलभीत लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते नेहरु-गांधी कुटुंबातील आहेत. वरुण यांनी भाजपमध्ये २००४ मध्ये प्रवेश केला.
- कैलाश विजयवर्गीय- सहावेळा लोकप्रतिनीधी म्हणून विजय मिळविणाऱ्या कैलाश यांनी विधानसभा निवडणुकीत कधीही पराभव पाहिला नाही. त्यांनी राष्ट्रीय भाजपमध्ये जबाबदारी घेण्यापूर्वी १२ हून अधिक वर्षे राज्यांच्या मंत्रिमंडळात काम पाहिले आहे. त्यांच्याकडे सध्या पश्चिम बंगालसाठी भाजप सचिव म्हणून पक्षाने जबाबदारी दिली आहे.
- दिनेश त्रिवेदी- तृणमूल काँग्रेसचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मंत्री दिनेश त्रिवेदी हे मार्चमध्ये भाजपवासी झाले आहेत. त्यांना अतुलनीय कामगिरीबद्दल संसदेकडून २०१६-१७ मध्ये सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सन्मानित करण्यात आले होते.
- सरबनंद सोनोवाल-त्यांनी केंद्रीय राज्य क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून भाजप सरकारमध्ये २०१४ ते २०१६ मध्ये जबाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये आसाममध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या जागी पुन्हा हिंमत विश्व शर्मा यांची मुख्यमंत्रिपदाची नियुक्ती करण्यात आली आहे.
- पशुपती पारस - लोकजनशक्ती पक्षाचे सदस्य असलेले पशुपती हे हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते दिवगंत खासदार राम विलास पासवान यांचे लहान बंधू आहेत. त्यांची नुकतेच चिराग पासवान यांच्याजागी लोकजनशक्ती पक्षाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे.
हेही वाचा-'माहिती तंत्रज्ञान नियमावली 2021'च्या तरतुदींवर भारताने पुर्नविचार करावा - संयुक्त राष्ट्र
दरम्यान, मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर ५७ मंत्र्यांनी (नव्याने १२ मंत्र्यांनी) मे २०१९ मध्ये शपथ घेतली होती.