ब्रिटनमधील एका मूळच्या मल्याळी मेकॅनिकल अभियंत्याने ( UK Based Kerala Engineer ) लॉकडाऊनच्या काळाचा अत्यंत कल्पकतेने वापर करून चक्क स्वतःचे विमान ( Engineer Builds Plane ) तयार केले. केवळ दाखविण्यापुरते हे विमान नव्हते तर त्या विमानाने त्याने चक्क गगनभरारीही घेतली आहे. आपल्या कुटुंबासह त्याने या विमानातून युरोपचा दौराही केला.
केरळचा रहिवासी -अशोक थामरक्षन असे या अभियंत्याचे नाव आहे. केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील तो रहिवासी आहे. या अभियंत्याने ब्रिटिश नागरी विमान वाहतूक कंपनीकडून वैमानिकाचा परवाना मिळवला होता. अशोक यांनी सांगितले की, "लॉकडाऊनच्या काळात मला विमान बनवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी मी लंडनमधील माझ्या घरात एक तात्पुरते वर्कशॉप सुरू केले. मी मे 2019 मध्ये विमानाचे काम सुरू केले आणि ते 21 नोव्हेंबर 2021 रोजी पूर्ण केले. ."
पहिले उड्डाण 7 फेब्रुवारीला केले - "परवान्यासाठी, तीन महिन्यात तीन वेळा ट्रायल फ्लाइट आवश्यक होती. पहिले उड्डाण 7 फेब्रुवारी 2022 रोजी 20 मिनिटांचे लंडनमध्ये होते. त्यानंतर 6 मे रोजी आम्ही त्याच विमानातून जर्मनी, फ्रान्स आणि इटलीचा कौटुंबिक दौरा केला, असेही अशोक यांनी पुढे सांगितले. ट्रॅफिक ब्लॉकच्या समस्यामुळे अशोक यांनी स्वतः विमान बनवण्याचा विचार केला. आता विमानाच्या सहाय्याने ते एका तासात 250 किलोमीटरचा प्रवास कोणत्याही ट्रॅफिक ब्लॉकशिवाय करू शकतात.