उज्जैन -रक्ताचं एक मूल असावं असा काहीचा जणांचा हट्ट असतो. यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. आपल्याला रक्ताचे अपत्य मिळावे म्हणून एका व्यक्तीने नागपूरमधून एका तरुणीची खरेदी केली आणि तिच्याकडून अपत्य मिळताच तिला वाऱ्यावर सोडून दिल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे घडली आहे. गावातील लोकांना आपण गरोदर दिसावे, यासाठी आरोपीची पत्नी गावात पोटावर उशी बांधून फिरायची.पोलिसांनी आरोपी राजपाल सिंह आणि त्याची पत्नी चंद्रकांता यांना ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोघांनाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे.
भाजपाचा (BJP) उपसरपंच राजपाल सिंह आणि त्याची पत्नी चंद्रकांता यांनी रक्ताचे मुल असावं यासाठी नागपूरमधील एका युवती खरेदी केली आणि गावातील लोकांपासून लपवून तिला तब्बल 16 महिने घरात ठेवले. यावेळी आरोपीने तरुणीसोबत शाररिक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी गर्भवती राहिली. प्रसुतीसाठी तरुणीला राजपालने पत्नीच्या नावे देवासमधील विनायक रुग्णालयात दाखल केले. तरुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर राजपालने बाळाचा ताबा घेतला आणि 19 वर्षीय युवतीला सोडून दिले. देवासमध्ये उज्जैन पोलिसांना तुरूणी बेवारस अवस्थेत सापडली. पोलिसांनी तरुणीची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला
पीडित महिला नागपूरजवळील (Nagpur) गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तिला आई-वडील नसून ती तिच्या धाकट्या भावासोबत राहत होती. स्वत:चा आणि भावाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती महिन्याला 5 हजार रुपयांवर काम करायची. चंदा नावाच्या महिलेने आपल्या लग्नाचे आमिष दाखवून विकल्याचे पीडितेने सांगितले. आरोपीने तरुणीची खरेदी करून तिला घरी आणले. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीच्या पत्नीने आपण गर्भवती असल्याचे नाटक रचले. गर्भवती असल्याचे लोकांना दिसावे म्हणून आरोपीच्या पत्नीने आपल्या पोटावर उशी बांधायची.