नवी दिल्ली : Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका वक्तव्यावरून वाद वाढत आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी तामिळनाडूतील एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माची तुलना कोरोना, डेंग्यू आणि मलेरियाशी केली. मी संमेलनाला 'सनातन धर्माचा विरोध' म्हणण्याऐवजी 'सनातन धर्माचं उच्चाटन' म्हटल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन करतो, असं स्टॅलिन म्हणाले.
काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन : 'काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला संपवल्या पाहिजेत. आपण त्याचा फक्त निषेध करू शकत नाही. डास, डेंग्यू, कोरोना आणि मलेरिया या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण विरोध करू शकत नाही. आपल्याला त्यांना संपवायचं आहे. सनातन धर्मही असाच आहे. तो मिटवायला हवा. त्यासाठी केवळ निषेध करणं पुरेसं होणार नाही', असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. 'हे आपलं पहिले कार्य असावं. कारण सनातन धर्म समता आणि सामाजिक न्याय या दोन्हींना विरोध करतो', असंही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाची दिल्ली पोलिसांकडे तक्रार : स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झालाय. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी रविवारी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विनीत जिंदाल यांनी दावा केला आहे की, उदयनिधी स्टॅलिन यांनी भाषणात सनातन धर्माविरोधात प्रक्षोभक, चिथावणीखोर, अपमानास्पद आणि चिथावणीखोर विधान केलं. 'उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपुष्टात आणण्याच्या वक्तव्यामुळे आणि सनातन धर्माची तुलना डास, डेंग्यू, कोरोना आणि मलेरियाशी केल्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत', असं जिंदाल म्हणाले.