रांची : झारखंडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत दोन सुरक्षा दलाच्या जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच जवानांच्या वीरमरणाची बातमी घरी धडकल्याने या जवानांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस दलातील उपनिरीक्षक अमित तिवारी आणि हवालदार गौतम कुमार यांना वीरमरण आले आहे.
शोधमोहीमेवरुन परत येत होते जवान : झारखंड नक्षलविरोधी पथकातील जवान शोधमोहीमेवरुन परत येत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पाळत ठेऊन परतणाऱ्या जवानांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात उपनिरीक्षक अमित तिवारी आणि हवालदार गौतम कुमार यांना वर्मी गोळी लागल्याने त्यांना जागेवरच वीरमरण आले. यावेळी नक्षलविरोधी पथकाने प्रत्युत्तरात गोळीबार केला. मात्र नक्षलवादी घटनास्थळावरुन पसार होण्यात यशस्वी झाले.
अमित तिवारींना तीन दिवसापूर्वी झाला होता मुलगा : नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पलामू येथील रहिवाशी अमित कुमार यांना वीरमरण आले. उपनिरिक्षक अमित कुमार यांना तीन दिवसापूर्वीच मुलगा झाला होता. नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम संपवून अमित कुमार हे मुलाला भेटण्यासाठी गावी जाणार होते. मात्र मुलाचे तोंड पाहण्यापूर्वीच त्यांना वीरमरण आले. त्यामुळे मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उपनिरीक्षक अमित कुमार यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.
चाईबासामध्ये मिसिर बेसरा या नक्षलवाद्याची दहशत :चाईबासा या नक्षलग्रस्त परिसरात मिसिर बेसरा या नक्षलवाद्याची दहशत आहे. या दहशतवाद्यावर सरकारने एक कोटीचे बक्षिस जाहीर केले होते. या नक्षलवाद्याच्या बंकरचा शोध सुरक्षा दलांनी लावल्यानंतर त्याला पकडण्यात आले. मात्र घटनास्थळावरील सामान आणण्यासाठी पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांच्यासह पथक जात असताना अंबुश लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी हवालदार सुशांतकुमार खुंटिया यांना वीरमरण आले होते.
हेही वाचा -
- Two Naxalites killed in Encounter : सुकमाच्या भेजई भागात डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार
- Naxalites Surrendered : सुकमामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 32 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण