हैदराबाद :लेफ्टनंट कर्नल व्ही.व्ही.बी. रेड्डी यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री हैदराबादच्या बेगमपेट एअरफोर्स स्टेशनवर आणण्यात आले. यावेळी रेड्डी यांना संपूर्ण लष्करी इतमामात श्रद्धांजली वाहण्यात आली. लष्कराच्या तेलंगणा - आंध्र प्रदेश उप - प्रदेशाचे कमांडिंग अधिकारी असलेले कार्यवाहक जनरल ऑफिसर ब्रिगेडियर के सोमाशंकर यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण केला. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
आज अंत्यसंस्कार होणार : हैदराबादहून रेड्डी यांचा मृतदेह त्यांच्या मलकाजगिरी येथील निवासस्थानी नेण्यात आला आहे. तेथे त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट कर्नल रेड्डी गेली सुमारे 20 वर्षे लष्करात सेवा देत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी देखील लष्करी सेवेत असून त्या लष्करात दंतवैद्य आहेत.
हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण : लेफ्टनंट कर्नल रेड्डी यांचे कुटुंब तेलगणाच्या मलकाजगिरी भागात राहते. ते मूळचे तेलंगणातीलच यदाद्री - भोंगीर जिल्ह्यातील बोम्माला रामाराम गावचे रहिवासी आहेत. गुरुवारी सकाळी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील मांडलाजवळ लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात लेफ्टनंट कर्नल व्ही.व्ही.बी. रेड्डी आणि सहवैमानिक मेजर जयनाथ ए. यांना वीरमरण प्राप्त झाले होते.
लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघातांमध्ये वाढ : संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी गुवाहाटी येथे सांगितले की, हेलिकॉप्टर आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातून अरुणाचल प्रदेशातील तवांगला जात होते. ते म्हणाले की, उड्डाणा दरम्यान हेलिकॉप्टरला प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला आणि ते मिसमारीला परतत असताना हा अपघात झाला. गेल्या काही काळात लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर रुद्र क्रॅश झाले होते. या अपघातात बचाव पथकाने पाच मृतदेह बाहेर काढले आहेत.
हेही वाचा :Pulwama Encounter : पुलवामात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू, जवानांचा परिसराला वेढा