मुंबई -अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) काल सोमवारी रात्री कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारीला अटक केली. अटक केल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. आज तिला न्यायालयात हजर करण्यात येणार असून एनसीबीकडून तिच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल. मीरा रोड येथील एका हॉटेलवर छापा मारत पोलिसांनी तिला अटक केली.
मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणाचा सखोल तपास -
दाक्षिणात्य अभिनेत्री श्वेता कुमारीला ड्रग्ज प्रकरणात अटक श्वेता कुमारी (२७) मुळची हैदराबाद येथील आहे. बॉलिवूड आणि सीने क्षेत्रातील अमली पदार्थ तस्करीचा मुंबई पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. याआधीही अनेक अभिनेते, अभिनेत्री आणि चित्रपट सृष्टीतील बड्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे. अमली पदार्थांचा पुरवठा करणारे आणि त्यांच्या हस्तकांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. अमली पदार्थांचे मोठे 'ड्रग सिंडिकेट' चा पर्दाफाश करण्याचा विडा मुंबई पोलिसांनी उचलला आहे.
२ जानेवारी मुंबईत ड्रग्ज साठा जप्त -
२ जानेवारीला मुंबई पोलिसांनी अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला होता. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या पथकाने मुंबई उपनगर आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत 100 ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी) आणि 1.34 किलो सायकोट्रॉपिक ड्रग्स जप्त करण्यात आले होते. तर चार औषध विक्रेत्यांना अटक करण्यात आली. हे आरोपी एक आंतरराज्यीय नेटवर्कचा भाग आहेत. मेफ्रेडोन किंवा एमडी ही कृत्रिम उत्तेजक औषधे आहेत आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये त्यांचा वापर केला जातो.