श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर): जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी श्रीनगरमध्ये कारवाई करत तीन स्वयंघोषित राजकारण्यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या तिघांनी काल श्रीनगरमध्ये भारताच्या अखंडतेच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या आणि पत्रकारांना धमकावले होते. सुहेल खान, नदीम शफी राथेर आणि उमर मजीद वानी अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ते स्वयंघोषित राजकारणी होते आणि ते पत्रकारांना धमकावत असत, असेही पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी या तिघांविरुद्ध कोठीबाग पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक ५/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
हे तिघे कोण आहेत?:हे तिघेही गेल्या वर्षी स्थापन झालेल्या अवामी आवाज पार्टीशी संबंधित आहेत. खान हे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि सध्या श्रीनगरच्या एचएमटी भागात राहतात, राथेर पक्षाचे सचिव आहेत आणि श्रीनगरच्या मालूरा भागात राहतात. आणि पेशाने इंजिनिअर असलेला वानी हा पक्षाचा सल्लागार असून श्रीनगरमध्ये राहतो. विशेष म्हणजे, पक्षाने गेल्या वर्षी २६ जानेवारीला लाल चौकातील क्लॉक टॉवरवर भारतीय तिरंगा फडकवून जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली होती आणि तेव्हापासून ते विविध मुद्द्यांवर आंदोलने आणि वक्तव्ये करत आहेत.
पत्रकार परिषद घेत म्हणाले छापू नका: काल या अवामी आवाज पक्षाच्यावतीने पत्रकारांना पत्रकार परिषदेसाठी निमंत्रण पाठवण्यात आले होते. त्यानंतर या तिघांनी पत्रकार परिषदही घेतली. मात्र पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांना बातम्या किंवा बातमीचे निवेदन प्रसिद्ध न करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. एखाद्या राजकीय पक्षाने आपली विधाने प्रकाशित न करण्याची विनंती करण्याची ही पहिलीच वेळ होती.