वाराणसी IIT BHU Sexual Harassment Case : दोन महिन्यांपूर्वी आयआयटी, बीएचयू सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केलीय. बलात्काराच्या घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले होते. मात्र, तब्बल दोन महिन्यानंतर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं आहे.
तिन्ही आरोपींची भाजपातून हकालपट्टी : आरोपी आणि भाजपामधील संबंध समोर आले आहेत. तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर या तिघांचे स्थानिक भाजपा नेते, आयटी सेलचे प्रमुख, भाजपा पदाधिकाऱ्यांसोबतचे फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळं विरोधी पक्षांच्या टीकेच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पक्ष दिसून येत आहे. विरोधी पक्षांच्या दबावानंतर भाजपानं या तीन तरुणांवर अंतर्गत कारवाई केली. तसेच भाजपानं तिन्ही आरोपींची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
आदेशानुसार पुढील कार्यवाही :याबाबत भाजपाचे वाराणसी जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. विश्वकर्मा म्हणाले, “या तिघांची नावे एका गुन्ह्यात आहेत. त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार आम्ही या तिघांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या प्रकरणी पक्षाने दिलेल्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.” या तिन्ही तरुणांचे भारतीय जनता पक्षात नेमके स्थान कोणते हे माहीत नाही. पक्षानेही याबाबत माहिती दिलेली नाही.
विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार : 2 नोव्हेंबरच्या मध्यरात्री तीन तरुणांनी दुचाकीवरून येऊन आयआयटीच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर 'या' आरोपींनी बंदुकीच्या धाकावर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. तसंच आरोपींनी विद्यार्थिनीला कपडे काढण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आरोपींनी तिचे कपडे काढतानाचा व्हिडिओ शूट केला होता. या घटनेनंतर आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आरोपींना पकडण्यासाठी आंदोलन छेडलं होतं.
आरोपी भाजपाचे कार्यकर्ते : ही घटना 2 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं होतं. या प्रकरणात कुणाल पांडे, आनंद उर्फ अभिषेक चौहान, सक्षम पटेल यांना अटक करण्यात आली आहे. तसंच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. हे तिन्ही आरोपी भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केलाय.
काय आहे प्रकरण :पीडित विद्यार्थिनी 2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री न्यू गर्ल्स वसतिगृहातून शतपावली करण्यासाठी निघाली होती. त्यावेळी तिला वाटेत तिची एक मैत्रिण भेटली. त्यानंतर त्या काही अंतर चालून गेल्या. त्याचवेळी तीन अज्ञात तरुण दुचाकीवरून आयआयटी कॅम्पसमध्ये घुसले. त्यांनी दोन विद्यार्थ्यांना वेगळं केलं. त्यानंतर या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी अनेक दिवस कॅम्पसमध्ये बेमुदत आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी विनयभंग, सामूहिक बलात्कार, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून लैंगिक छळ कलम 509सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -
- धारावीतील अल्पवयीन मुलीच्या तस्करीतील आरोपींना बेड्या; पश्चिम बंगालमधून मुलीची सुटका
- आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा माजी फिरकीपटू बलात्कार प्रकरणात दोषी
- बिबवेवाडी, कात्रज परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी, 5.85 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त