पाटणा -बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बिहारी जनतेला भावनिक साद घातली आहे. 'ही माझी शेवटची निवडणूक आहे', असे भावनिक आवाहन नितीश यांनी केले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आज पूर्णिया येथील जाहीर सभेला संबोधित करत होते.
'निवडणूक प्रचाराचा आज शेवट होणार आहे. परवा मतदान होत आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला', अशा शब्दांत नितीश यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे. एलजेपी अध्यक्ष चिराग पासवान आणि राजद नेते तेजस्वी यादव हे नितीश कुमारांवर वारंवार टीका करताना दिसत आहेत.
नितीश यांनी १९७७ साली आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी नालंदाच्या हरनौत येथून राजकारणात प्रवेश केला होता. नितीश यांनी या मतदारसंघातून चारवेळा निवडणूक लढवली होती. यात त्यांना १९७७ आणि १९८० साली पराभव स्वीकारावा लागला होता.