नवी दिल्ली - महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले. मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे, असे ट्विट करून मोदींवर टीका केली. सत्तेत आल्यापासून सरकारने बेरोजगारी, महागाई, दारिद्र्य वाढवलं आहे. तर त्यांनी त्यांच्या मित्रांच्या कमाईत वाढ केलीय, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधींनी एका वृत्तपत्रातील आकडेवारी शेअर केली. त्यानुसार कोरोना महामारीपूर्वी 9.9 कोटी लोक मध्यम उत्पन्न गटात होते. ज्यांची संख्या 6.6 कोटींवर आली आहे. तर दररोज दीडशे रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे मिळविणार्या लोकांची संख्या 7.5 कोटींवर पोहोचली आहे. राहुल गांधी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधतात. यापूर्वीही राहुल गांधी यांनी कृषी कायदा आणि इतर अनेक मुद्द्यांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.
राहुल गांधी आसाममध्ये आमने-सामने -
राहुल गांधींनी आसाम दौर्यापूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधून हे ट्विट केले आहे. आसाममध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी आज आसाममध्ये असतील. त्याचबरोबर पीएम मोदी यांचीही आसाममध्ये जाहीर सभा होणार आहे. राहुल गांधी आज तिनसुकियात आयओसी रिफायनरी कर्मचार्यांशी चर्चा करणार आहेत. यासह राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा जोरहाट आणि विश्वनाथ येथे होणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी छाबुआमध्ये निवडणूक सभांना संबोधित करतील.
देश विकून मित्रांचा फायदा -
राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर, 'हम दो..हमारे दो' अशी घोषणाबाजी करत हल्लाबोल करत आहेत. मोदी हे अदानी आणि अंबानी यांना झुकतं माप देतातं, असा आरोपही राहुल यांनी केला आहे. केंद्र सरकार दिवसाढवळ्या दोन्ही हातानी लूटमार करत असून गॅस-डिजल-पेट्रोलवर मोठ्याप्रमाणेत करवसूली केली जाते. तसेच पब्लिक सेक्टर बँका मित्रांना विकल्या जात आहेत. देश विकून मित्रांचा फायदा मोदी करत आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले होते.
हेही वाचा -'खेळ संपला, आता फक्त विकास होणार'; दीदींच्या 'खेला होबे' घोषणेला मोदींचे प्रत्युत्तर