महाबळेश्वर -महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ हे सातारा जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून 1353 मीटरवर महाबळेश्वर वसले आहे. डोंगर, दऱ्या, पठारं आणि मैदानं यांनी सजलेले महाबळेश्वर वर्षानुवर्षं पर्यटकांच्या पसंतीचे स्थळ राहिले आहे. धाडसी ट्रेक आणि निसर्गाचा आनंद लुटायचा असेल, तर महाबळेश्वर हा पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. महाबळेश्वर Mahabaleshwar आणि त्याच्या आसपासच्या परिसरात अनेक अशी ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही जाऊ शकता आणि पर्यटनाचा चौफेर आनंद लुटू शकता. मे महिन्यात येथे स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल देखील भरला जातो.
पाचगणी - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. Panchgani महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि. मी. अंतरावर आहे. लोणावळा - खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लॅंड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील टेबल लॅंड वर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेले आहे. पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर येऊन हे डोंगर तयार झाले असावे, असे मानले जाते. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झाल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे असे मानले जाते.
लोणावळा - हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे. पुण्यामुंबईपासून जवळ असल्याने सुट्टीच्या दिवशी रोजच्या घाईगर्दीतून थोडा वेळ बाजूला काढून पर्यटकांची पावले लोणावळयाकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. मुंबईपासून लोणावळा 110 तर पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, Lonavla खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत. येथून दोन किलोमीटरवर कैवल्यधाम हा आश्रम आहे. येथे योगिक उपचारांसोबतच संशोधन व योग प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. लोणावळयानजीक मळवलीवरुन कार्ले व भाजे लेणी अगदी पाच दहा किलोमीटर अंतरावर आहेत. येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे.