हैदराबाद - हैदराबादमध्ये ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. घरच्यांच्या परवानगीशिवाय लग्न केल्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. हैदराबादमधील सरूर नगर पोलीस स्टेशन अंतर्गत जीएचएमसी ऑफिस रोडवर बुधवारी (दि. 4 मे)रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ली गावातील विल्लुपुरम नागराज याचे मारपल्लीजवळील घनापूर गावात राहणाऱ्या सय्यद अश्रीन सुलताना हिच्याशी सात वर्षांपासून प्रेम प्रकरण होते. हा प्रकार कळताच अश्रीनच्या कुटुंबीयांनी त्याला ताकीद दिली. अश्रीनशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या नागराजने काही महिन्यांपूर्वी हैदराबादमधील एका आघाडीच्या कार कंपनीत सेल्समन म्हणून कामाला सुरूवात केली.
नववर्षाच्या दिवशी अश्रीनला गुपचूप भेटलेल्या नागराजने तिला काही दिवसांतच त्याच्याशी लग्न करण्याचे सांगितले. अश्रीनने त्याचा प्रस्ताव स्वीकारला आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ते घरातून पळून हैदराबादला आले. 31 जानेवारीला लाल दरवाजा येथील आर्य समाजात दोघांनी विवाह केला.
लग्नानंतर नागराज दुसऱ्या नोकरीला लागला. नवविवाहित जोडपे दोन महिन्यांपूर्वी विशाखापट्टणम येथे राहायला गेले, जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना ते हैदराबादमध्ये राहत असल्याचे लक्षात आले. कोणीही त्यांचा पाठलाग करत नसल्याचे गृहीत धरून ते पाच दिवसांपूर्वी पुन्हा शहरात आले होते. ते सरूर नगर येथील अनिलकुमार कॉलनीत पांजा येथे राहत होते.
अश्रीनच्या कुटुंबीयांना त्यांच्या हालचाली लक्षात आल्याने त्यांनी नागराजला मारण्याचा कट रचला. बुधवारी रात्री नागराज आणि अश्रीन कॉलनीतून बाहेर आले असता अश्रीनचा भाऊ आणि त्याच्या मित्राने दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला. नागराजवर लोखंडी रॉड आणि तलवारीने हल्ला करून त्याची जागीच हत्या केली.
भावाने पतीला खाली पाडून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने अंदाधुंद वार केल्याने तरुणीला धक्काच बसला. तिने आपल्या पतीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले आणि खूप आरडाओरडा केला. तिने वारंवार तिच्या भावाला विनंती केली की आपल्या पतीला मारू नका. दरम्यान, स्थानिकांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विशेष पथकाने आरोपींना अटक केली.
हेही वाचा -शिर्डीच्या साई मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद करू नका, मुस्लिम समाजाची पोलिसांकडे मागणी