हैदराबाद -कोविड १९ च्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर तातडीने लस उपलब्ध व्हावी यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अस्त्रा झेनेका या बायोफार्मास्युटिकल कंपनीद्वारे संशोधित कोविड १९ च्या लसीचे ४ कोटी डोस तयार केले आहेत. तसेच, जानेवारी २०२१ पर्यंत ३० कोटी डोस तयार करून ते साठवून ठेवण्याचा कंपनीचा मानस आहे.
दरम्यान, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही ८७ लाख २८ हजार ७९५ इतकी आहे. यातील ४ लाख ८४ हजार ५४७ सक्रिय रुग्ण आहेत. ८१ लाख १५ हजार ५८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, १ लाख २८ हजार ६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांनंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र, गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत होती. मात्र, आज पुन्हा रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. मुंबईत आज ८०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, १७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा ६९ दिवसांवरून २४२ दिवसांवर गेल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, भारतीय रेल्वेने शिक्षण आणि शाळेकरी कर्मचाऱ्यांना मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. रेल्वे स्थानक परिसरात प्रवेश मिळण्यासाठी शिक्षकांकडे वैध ओळख पत्र असणे आवश्यक असेल, असे मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागाने आपल्या सयुक्त प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.
दिल्ली - प्रेदेशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. वायू प्रदूषणामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे सांगत येत्या ७ ते १० दिवसात परिस्थिती आटोक्यात येईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.