विल्लुपुरम (तामिळनाडू) : विषारी दारू पिल्यामुळे तीन महिलांसह दहा नागरिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या दोन वेगवेगळ्या घटना तामिळनाडूतील विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात रविवारी घडल्या आहेत. यात मारक्कनम परिसरातील एक्कीयरकुप्पम येथील घटनेत सहा नागरिकांचा रविवारी मृत्यू झाला. तर चेंगलपट्टू जिल्ह्यातील मुरंथागममध्ये विषारी दारू पिल्यामुळे शुक्रवारी दोन जणांचा मृत्यू झाला. तर याच गावात रविवारी एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विषारी दारू पिल्यामुळे तब्बल दहा नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
इथेनॉल मिथेनॉल मिश्रीत दारू :तामिळनाडू येथील विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू या दोन जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सध्या दोन डझनहून अधिक लोक उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एन कन्नन यांनी दिली आहे. नागरिकांनी पिलेल्या विषारी दारूत इथेनॉल-मिथेनॉल पदार्थांसह विषारी दारूचे सेवन केल्याची माहितीही त्यांनी दिली. तामिळनाडूच्या उत्तर विभागात बनावट दारूमुळे मृत्यूच्या दोन वेगळ्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांना या दोन घटनामधील संबंधाचा कोणताही पुरावा सापडला नाही. दोन्ही घटनांमधील संबंध शोधण्यासाठी पोलीस तपास करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नागरिकांना झाला उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास :मारक्कनमजवळील विल्लुपुरम जिल्ह्यातील एक्कियारकुप्पम गावात रविवारी 6 जणांना उलट्या, डोळ्यांची जळजळ आणि चक्करचा त्रास होत होता. त्यामुळे या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेतली. इतर नागरिकांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण अतिदक्षता विभागात आहेत. 33 नागरिकांवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक एन कन्नन यांनी रविवारी विल्लुपुरम येथे पत्रकार परिषदेत दिली.
एका संशयिताला केले अटक :विषारी दारू पिल्यामुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याने विल्लुपुरम येथे खळबळ उडाली होती. तर दोन जण आयसीयूत उपचार घेत होते. मात्र आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्या दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे विल्लुपुरम जिल्ह्यात मृत्यूची संख्या सहा झाली आणि एकूण मृतांची संख्या 10 झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक एन कन्नन यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अमरन नावाच्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून बनावट दारूही जप्त करण्यात आली. दारूचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहितीही पोलीस महानिरीक्षक एन कन्नन यांनी दिली आहे.
चेंगलपट्टू जिल्ह्यातील चार नागरिकांचा मृत्यू :तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेत 4 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहितीही पोलीस महानिरीक्षक एन कन्नन यांनी दिली. सकाळी चेंगलपट्टू जिल्ह्यातील चिथामूर येथे एका कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. तर अन्य एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला कौटुंबिक वादामुळे हा आत्महत्येचा प्रयत्न असावा, असे आम्हाला वाटले. मात्र त्यांची लक्षणे पाहिल्यानंतर आम्हाला ही बनावट दारूची घटना असल्याचा संशय आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विषारी दारू प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित :विषारी दारू पिल्यामुळे दहा नागरिकांचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानंतरही आणखी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. चेंगलपट्टू येथील एकूण चार जणांचा मृत्यू झाला तर पाचव्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी विषारी दारू विक्री प्रकणात अम्मावसाई नावाच्या एका आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक एन कन्नन यांनी दिली. या दोन्ही घटनांमध्ये काही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. संबंधित अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली आहे. विल्लुपुरम मारक्कनममध्ये 2 निरीक्षकांसह 2 उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चेंगलपट्टूमध्ये एक निरीक्षक आणि 2 उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहितीही पोलीस महानिरीक्षक एन कन्नन यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- Bihar Crime : बिहारमध्ये प्रयागराजसारखी घटना, तरुणांनी पाठलाग करून पंचायत प्रमुखाच्या पतीला घातल्या गोळ्या
- Karnataka Congress: विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे सर्व अधिकार मल्लिकार्जुन खरगेंकडे, बैठकीत झाला निर्णय
- Satopanth: निसर्गाच्या सान्निध्यात ट्रेकिंगचा आनंद लुटत बद्रीनाथ धामसह यात्रेकरूही सतोपंथलाही देतात भेट