हैदराबाद -तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तापट स्वभावाचे आणि कडक बोलणारे म्हणून ओळखले जात. नुकतेच त्यांच्या तापट स्वभावाचं दर्शन घडलं आहे. चंद्रशेखर राव यांनी रविवारी राजन्ना सिर्किल्ला जिल्ह्यातील मंडेपल्ली गावाला भेट दिली. यावेळी डिग्निटी हाउसिंग कार्यक्रमाअंतर्गत (Dignity Housing Program) बांधलेल्या 1,320 घरांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, उद्घाटन करताना रिबिन कापण्यासाठी कात्री वेळवर न मिळाल्याने चंद्रशेखर राव यांनी थेट हातानेच रिबिन काढली आणि उद्धाटन केले. हे पाहून सर्वच जण हैराण झाले.
वास्तविक, रविवारी सीएम केसीआर गृहनिर्माण युनिटचे उद्घाटन करण्यासाठी सिर्किल्ला जिल्ह्यात आले होते. रिबिन कापून गृहनिर्माण युनिटचे उद्घाटन करण्यासाठी ते दारासमोर उभे होते. यावेळी रिबिन कापण्यासाठी त्यांनी कात्री मागितली. तेव्हा सर्वजण कात्रीसाठी इकडे तिकडे पाहू लागले. कात्रीची शोधाशोध सुरूच होती. कात्री काही मिळत नसल्याचे दिसताच राव यांनी थेट हाताने रिबिन तोडून गृहनिर्माण युनिटचे उद्घाटन केले. हा संपूर्ण प्रसंग व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.