हैदराबाद Telangana Assembly Elections 2023 : तेलंगाणा विधानसभा निवडणूक 2023 आता जवळ येऊन ठेपली आहे. मात्र मतदारांनी उमेदवारांच्या डोक्याला ताप करुन ठेवला आहे. त्यातही निवडणूक जरी तेलंगाणा राज्यात होत असली, तरी पुण्या-मुंबईत प्रचाराच्या बैठका होत असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तेलंगाणातील अनेत मजूर महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि भिवंडीत स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे तेलंगाणातील उमेदवार त्यांच्या मागे पुणे, मुंबईत बैठकावर बैठका घेत आहेत.
- महाराष्ट्रात स्थलांतरित झाले तेलंगाणातील कामगार :तेलंगणातील स्थलांतरित कामगार पुणे, मुंबई आणि भिवंडीत स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या तेलंगाणातील उमेदवार मुंबई, पुणे आणि भिवंडीच्या विविध भागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात फिरत आहेत. मतदारयाद्या गावनिहाय घेऊन संबंधित मतदारांचा तपशील आणि पत्ते या उमेदवारांकडून शोधले जात आहेत.
तेलंगाणातील भावी आमदार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर :तेलंगाणातील अनेक मतदार महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानं भावी आमदार आणि त्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रात हात जोडत फिरत आहेत. तेलंगाणातील प्रमुख पक्षांचे नेतेही मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना मतदान करण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता वाढवत असल्याचा दावा ते तेलंगाणात करत आहेत. 30 तारखेला मतदानाच्या दिवशी गावात येण्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था करण्याचं आश्वासनही भावी आमदारांनी या उमेदवारांना दिलं आहे, असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे काही उमेदवार अगोदरच मुंबई आणि पुण्यात जाऊन त्यांनी स्थलांतरित मतदारांच्या बैठका घेतल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.