नवी दिल्ली -अॅलोपॅथी उपचार पद्धतीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर रामदेव बाबा अडचणीत आले आहेत. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेत थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयालकडे दाद मागितली. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी प्रतिक्रिया दिली. रामदेव बाबा यांचे विधान निराशाजनक होते. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे, असे हर्षवर्धन म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी योगगुरु रामदेव यांना पत्र लिहून अॅलोपॅथीविरोधातील आपले आक्षेपार्ह विधान मागे घेण्यास सांगितले आहे. आरोग्य कर्मचारी दररोज देशवासियांसाठी कोरोनाविरोधात लढा देत आहेत. या विधानामुळे 'कोरोना योद्धा' यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे हर्ष वर्धन म्हणाले.
अॅलोपॅथी औषधे आणि डॉक्टरांवरील तुमच्या विधानामुळे देशवासियांना मनापासून दु:ख झाले आहे. डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी कोरोनाविरूद्ध रात्रंदिवस लढा देत आहेत. आपल्या वक्तव्यामुळे आपण केवळ कोरोना योद्ध्यांचा अनादरच केला नाही. तर देशवासीयांच्या भावनांनाही दुखावले आहे. तुमच्याकडून जारी करण्यात आलेले स्पष्टीकरण लोकांच्या दुखलेल्या भावनांवर मलम लावण्यासाठी पुरेसे नाही, असे हर्ष वर्धन यांनी पत्रात म्हटलं.