आग्रा (उ. प्रदेश) : आग्र्यात आजपासून 19 फेब्रुवारी पर्यंत मुघल सम्राट शाहजहाँचा 368 वा उर्स (उत्सव) साजरा होत आहे. या दरम्यान ताजमहालमध्ये अनेक विधी संपन्न होतील. उर्स समितीचे अध्यक्ष इब्राहिम जैदी यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुघल सम्राटाचा उर्स आजपासून 19 फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे. या दरम्यान सर्वांना ताजमहालमध्ये मोफत प्रवेश दिला जाईल. म्हणजेच आजपासून तीन दिवस ताजमहाल पाहण्यासाठी कोणालाही तिकीट काढावे लागणार नाही.
ताजमहालला चंदनाची पेस्ट लावणार : उर्स दरम्यान ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांना ताजही पाहता येणार आहे. तसेच त्यांना सम्राट शाहजहान आणि त्याच्या बेगमची समाधीही जवळून पाहता येणार आहे. एवढेच नाही तर पर्यटकांना उर्स दरम्यान होणाऱ्या धार्मिक विधींचे साक्षीदारही होता येणार आहे. उर्स समितीचे अध्यक्ष इब्राहिम जैदी यांनी सांगितले की, उर्सच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज गुसलचा विधी करण्यात येणार आहे. यानंतर अजान आहे. 18 फेब्रुवारी रोजी संदल व मिलाद शरीफचा विधी पार पडणार आहे. संदल समारंभात ताजमहालावर चंदनाची पेस्ट लावली जाते. ताजमहालला यामुळे चांगला सुगंध येतो.