नवी दिल्ली :ज्ञानवापी मशीद प्रकरणी आज सकाळपासून वैज्ञानिक सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले होते. मात्र ज्ञानवापी मशीद प्रकरणी आठवडाभर उत्खनन होणार नसल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 जुलैपर्यंत सर्वेक्षणावर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीला मशीद परिसराच्या ASI सर्वेक्षणाबाबत वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर विचार :वाराणसी जिल्हा न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाद्वारे ज्ञानवापी मशिदीचे सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या 21 जुलै रोजीच्या आदेशावर विचार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठात सुनावणी :ज्ञानवापी मशीद ही हिंदू मंदिरावर बांधली गेली होती की नाही, याची वस्तुस्थिती उघड करणे गरजेचे आहे. मात्र ही वस्तूस्थिती उघड करण्यासाठी शास्त्रोक्त तपासणी आवश्यक असल्याचे जिल्हा न्यायालयाने मान्य केले होते. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याबाबत सुनावणी घेतली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर मशिदीमध्ये केलेल्या उत्खननाच्या कामाची स्पष्टता देण्यास सरन्यायाधिशांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करेपर्यंत कोणतीही सुनावणी होणार नसल्याचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी यावेळी स्पष्ट केले.
मशीदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी :वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशीद संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. यात महिलांनी वजूखाना वगळता ज्ञानवापी मशीद संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगीसाठी ही याचिका दाखल केली होती. त्यावर वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशीद संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी भारतीय पुरातत्व विभागाला दिली होती. मात्र ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीच्या वतीने वरिष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने आठ दिवस सर्व्हेक्षण न करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा -
- Gyanvapi Campus Survey : ज्ञानवापी परिसरात पोहोचले पुरातत्व खात्याचे पथक, वैज्ञानिक सर्वेक्षणानंतर काय माहिती समोर येणार?